• मारीहाळ पोलिसांकडून तपास सुरू 

बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या महिन्यात सांबऱ्यानजीक सुळेभावी येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच, काल शिंदोळी (ता. बेळगाव) येथे दोन तरुणांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. शिंदोळी गावात क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. रविवारी रात्री उशिरा स्पर्धेनंतर लोक घरी परतत असताना ही घटना उघडकीस आली. बसवराज बेळगावकर (वय २४) व गिरीश नगुनावर (वय २४) दोघेही रा. शिंदोळी अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत.

रविवारी रात्री ११ वा. सुमारास मारीहाळ पोलीस मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या  विमानतळावर आगमनाच्या बंदोबस्तात व्यस्त असताना घडलेल्या घटनेने खळबळ माजली होती. यानंतर रात्री ११ वा. सुमारास पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला.

वाहन व्यवसाय व वैयक्तिक वैमनस्यातून हा दुहेरी खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेची नोंद मारीहाळ पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे बेळगावच्या पूर्व भागात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.