• केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचे प्रतिपादन 

सुळगा (हिं.) / वार्ताहर

जनता ही आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची संपत्ती आहे. बेळगाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याने  त्यांचा पराभव करणे अशक्य असल्याचे केपीसीसीचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी सांगितले.

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील सुळेभावी येथे हर्षा शुगर्सच्या वतीने महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जनतेच्या सेवेसाठी स्वतःचा जास्ती जास्त वेळ दिला आहे. जनता ही त्यांची ताकद आहे. चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी नेहमीच परमेश्वराचा आशीर्वाद असतो. लक्ष्मी हेब्बाळकर आमदार झाल्यानंतर निष्ठेने, प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत आहेत. निवडणुक हे फक्त निमित्त आहे. त्या नेहमी जनतेमध्येच असतात. एवढा चांगला आमदार निवडून आणून मतदार संघातील जनतेने आम्हाला बळ दिले आहे. आगामी निवडणुकीतही त्यांना विजयी करण्यासाठी मतदारसंघातील जनतेने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचार वाढला आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्यांचे उत्पन्न बुडाले आहे. अशा सरकारला धडा शिकवून सत्तांतर घडविण्याचा जनतेचा निर्धार आहे. यावेळी भाजप कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर येऊ शकत नाही, असे डी.के. शिवकुमार म्हणाले.

लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांना विणकरांच्या विकासासाठी बेळगावमध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्याचे आवाहनही करताना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्याचा समावेश केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.


यावेळी बोलताना बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, महालक्ष्मी देवीचा जत्रोत्सव होत असलेल्या ठिकाणी हळदी - कुंकू कार्यक्रम होणे हे आपल्या गत जन्माचे पुण्य आहे. आई महालक्ष्मी देवीच्या साक्षीने मी गेल्या साडेचार वर्षात सर्व प्रकारची विकासकामे प्रामाणिकपणे केली आहेत. सर्वात लहानापासून मोठ्यांपर्यंत, सर्वांच्या सेवेसाठी मी  कटिबद्ध आहे, सर्वांबद्दल सहानुभूती आहे. काही जण माझ्या नावावर श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र केवळ लोकांच्या आशीर्वादानेच मी या टप्प्यावर पोहोचले आहे, असे त्या म्हणाल्या.

यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराजा हट्टीहोळी, महेश सुगन्नेवर, रत्नव्वा कोलकार, दत्ता बंदिगाणी, नारायण लोकरे, इस्माईल तिगडी, इसाक जमादार, संभाजी यमोजी, बसप्पा कुकडोळळी यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व गावातील महिला मोठ्या संख्येने  उपस्थित होत्या.