बेळगाव / प्रतिनिधी
राज्यात एका वर्षात शंभरहून अधिक पोलिस स्थानकांच्या नूतन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. वाहतूक पोलिसांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे कामही चांगल्या पद्धतीने होत आहे. राज्यात २५०० पोलिसांसाठी सदनिकांचे बांधकाम करण्यात येत असून ११६ पोलीस स्थानकांच्या नूतन इमारतींचे काम पूर्ण झाले असून त्या उदघाटनाच्या प्रतिक्षेत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. आज बुधवारी बेळगाव पोलीस आयुक्तालय नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
८० कोटी रुपये खर्चून ३०० जीप आणि स्कॉर्पिओ खरेदी करण्यात येत असून लवकरच जिल्हा पोलीस प्रमुखांना स्कॉर्पिओ वाहने सुपूर्द केली जातील असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
'जनतेशी जवळचा संपर्क आवश्यक'
राज्याचा गृह विभाग सक्षमपणे काम करत आहे. कोणत्याही घटनेला सामोरे जाण्याचे सर्व अधिकार गृहखात्याकडे आहेत. कर्नाटक पोलीस हे संपूर्ण देशातील सर्वोत्तम पोलीस दल आहे. केवळ सीमेवर ताकद दाखवणे नाही तर लोकांच्या संपर्कात राहणे हे एक चांगले काम आहे. लोकांशी नेहमी जवळीक साधून त्यांच्या समस्या सोडविणाऱ्या बेळगाव पोलिसांचे त्यांनी अभिनंदन केले. अलीकडे तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीतही पोलीस सक्षमपणे काम करत असल्याचे ते म्हणाले. एसएसएल चा अहवाल पंधरा दिवसात आल्यास गुन्हे नियंत्रणासाठी अधिक सोयीचे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर बोम्मई यांनी फीत कापून व कोनशिला अनावरण करून बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन केले.
या कार्यक्रमाला गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, पोलीस महासंचालक प्रवीण सूद, गृह विभागाचे उपमुख्य सचिव रजनीश गोयल, शहर पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या आदि उपस्थित होते.
0 Comments