- बारामतीत कर्नाटकच्या बसला फासले काळे
बारामती दि. 7 डिसेंबर
सीमावाद आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या आंदोलनाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काल हिरेबागेवाडी (ता.बेळगाव) येथील टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र परवानाधारक वाहनांवर दगडफेक करून काळे फासले होते. करवेच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषिकांच्या गटानेकाल महाराष्ट्रातील बारामती बस स्थानकामध्ये कर्नाटकच्या बसला काळे फासून कर्नाटक सरकारचा निषेध केला.
सीमा वासियांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याकरिता महाराष्ट्रातील सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई हे काल मंगळवार दि. 6 डिसेंबर रोजी बेळगाव येथे येणार होते. सीमा समन्वयक मंत्र्यांच्या या दौऱ्याचा निषेध करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेचे प्रदेशाध्यक्ष टी. ए. नारायण गौडा देखील बेळगाव दौऱ्यावर येणार होते. मात्र बेळगाव पोलिसांनी हिरेबागेवाडी टोल नाक्यावरच त्यांना रोखले. यावेळी पोलीस आणि करवे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी सक्तीने सर्व कार्यकर्त्यांना बसमध्ये डांबून माघारी धाडण्याचा पवित्रा घेतला. यामुळे तणाव आणखीनच वाढला आणि संतप्त झालेल्या करवे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या महाराष्ट्र पासिंगच्या 5 हून अधिक वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली. तसेच वाहनांना काळे फसले. यावेळी करवेचे प्रदेशाध्यक्ष टी. ए. नारायण गौडा आणि करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाई बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. करवेच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषिकांच्या 10 ते 12 जणांच्या गटाने काल महाराष्ट्रातील बारामती बस स्थानकामध्ये कर्नाटकच्या हलियाळ बारामती बसला काळे फासून 'जय भवानी - जय शिवाजी', अशा जोरदार घोषणा दिल्या. मात्र यावेळी तेथे तातडीने हजर झालेल्या पोलिसांनी आंदोलकांनी बसवर फासलेला काळा रंग पुसून चालक - वाहक आणि प्रवाशांसह बस कर्नाटकातील हलियाळकडे सुरक्षितपणे परत पाठवली.
एकंदरीत सध्या प्रवासी आणि बसेसच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कर्नाटकातून महाराष्ट्रात बस वाहतूक सुरू ठेवायची की नाही यासंबंधी चर्चा सुरू सुरू असल्याची माहिती कर्नाटक परिवहनच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे. एकंदरीतच सीमावादामुळे दोन्ही राज्यांतून वारंवार आंदोलने होत आहेत. मात्र या आंदोलनामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान होत असून सामान्य जनता, वाहनधारकांसह प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.
0 Comments