• हलगा ग्रामस्थांची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी

आमच्या गावातील 2 एकर जमीन भारती ग्रामीण संस्थेला कोणत्याही कारणास्तव देऊ नये, ही जमीन ग्रामस्थांच्या वापरासाठी राखीव ठेवावी या मागणीसाठी हलगा (ता. बेळगाव) येथील ग्रामस्थांनी गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

यावेळी बोलताना ॲड. आप्पासाहेब म्हणाले, सुवर्ण विधानसौध बांधल्यामुळे येथील जमिनीला चांगला दर मिळत आहे. काही राजकीय नेते येथील जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील शेतकऱ्यांनी विधानसभा, राष्ट्रीय महामार्ग आणि पोलीस क्वार्टर्स बांधण्यासाठी यापूर्वीच जमिनी दिल्या आहेत. त्याच पद्धतीने रिंगरोड ही आमच्या जमिनीतून जाणार आहे. गायरान क्षेत्रातील 262/ मधील 22 एकरांपैकी 7 एकर जमीन गुरे चारण्यासाठी मिळावी यासाठी आम्ही धडपडत आहोत. मात्र असे असताना सरकारने भारती विकास संस्थेला 2 एकर जागा भारती ग्रामीण विकास संस्थेला देत आहे, ते योग्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

तर हलगा ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष चंद्रकांत यांनी गावातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच दोन एकर जमीन दिली असल्याचे सांगितले. आम्ही 2008 पासून लढा देत आहोत. जमीन दिल्यास आमची गुरे चरण्यासाठी कुठे सोडायची? असा मुद्दा उपस्थित केला. विधानसौध बांधण्यासाठी यापूर्वीच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जागा दिली आहे. याचबरोबर इतर सर्व गोष्टींसाठी ही शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात येथील शेतकऱ्यांपुढे चरण्यासाठी गुरे कुठे सोडायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर जागा देण्याचे रद्द करून गावच्या  हितासाठी जमीन आरक्षित करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी हलगा ग्रा.पं.अध्यक्ष सदानंद बिळगोजी, उपाध्यक्ष रूपा सुतार, सागर कामाण्णाचे, कल्पना हणमंताचे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.