सुळगा (हिं.) / वार्ताहर
बडाल अंकलगी (ता. बेळगाव) येथील नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज पार पडला. उद्घाटन समारंभाला ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या.
प्रारंभी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, शासनाच्या विकास योजना मिळणे हा जनतेचा हक्क असून त्या उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील जनतेला योग्य न्याय देण्याचे काम आपण करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मतदार त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदारांना निवडून देत विधिमंडळात पाठवतात. त्यामुळे जनतेची सेवा करणे आणि त्यांना हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देणे हे आमदारांचे कर्तव्य आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून जनतेचे प्रेम, विश्वास, आणि सहकार्याच्या पाठबळामुळेच गेल्या साडेचार वर्षात मी माझी जबाबदारी योग्यरीतीने पार पाडत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बडाल अंकलगीचे वैदिक मूर्ती श्री राचय्या हे होते. याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्षा गीता हिरेमठ, उपाध्यक्ष बसवंत नाईक, पीडीओ पार्वती जाधव, डी. एम. बन्नूर यांच्यासह सर्व ग्रा. पं. सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments