निपाणी / प्रतिनिधी

उद्या बुधवार दि. 30 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सीमा भागातील कायदा सुव्यवस्था रहावी याकरिता निपाणी येथे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस महत्त्वपूर्ण बैठक झाली.

निपाणी शहरातील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीला राज्यातील बिदर, कलबुर्गी, विजयपूर बेळगाव जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. तसेच महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सांगली सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

सीमाप्रश्नावरून उलटसुलट वक्तव्यामुळे  दोन्ही राज्यात  निर्माण झालेला तणाव  आणि  सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय नेतेमंडळी खाजगी कार्यक्रम, समारंभाना उपस्थित राहणार असतील तर आमचा विरोध नाही मात्र कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वक्तव्य करण्यासाठी येणार असतील तर त्यांना रोखले जाईल असे त्यांनी सांगितले.

बुधवारी सीमा प्रश्नावर सुनावणी होणार असल्याने कोणता निकाल येईल याची माहिती कोणालाच नाही तरीही निकालानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर  सीमा भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व शांतता कायम राहावी याकरिता  बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील  विविध राज्यांचे सीमेवर चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे विशेषतः कोगनोळी,कागवाड, निपाणी, संकेश्वर या भागातील चेक पोस्टवर विशेष नजर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'शांततेने आंदोलन करणाऱ्यांनाच परवानगी'

सीमा प्रश्न बाबत कोणताही निर्णय झाला तरी विविध संघटना व नागरिकांनी संयम बाळगावा. याचिकेवरील सुनावणीनंतर शांततेने आंदोलन करणाऱ्यांनाच परवानगी दिली जाईल. अन्यथा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व समाजातील शांतता बिघडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे अलोक कुमार यांनी सांगितले.

या बैठकीला बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी सतीश कुमार, शहर पोलीस आयुक्त  डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी यांच्यासह दोन्ही राज्यांचे तीन  पोलीस उपमहानिरीक्षक,आठ जिल्हा पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक आदि उपस्थित होते.