- राष्ट्रवादीचे माजी आ. के. पी. पाटील यांचे जाहीर मत
- बेळगावात काळ्या दिनाच्या निषेध सभेला संबोधन
(मराठा मंदिर येथील निषेध सभेला मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार, श्री. के. पी. पाटील) |
बेळगाव / प्रतिनिधी
इ. स. 1956 साली झालेल्या भाषावार प्रांतरचनेनंतर बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदर-भालकीसह बहुलभाषिक सीमा भाग अन्यायकारक पद्धतीने म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. तेव्हापासून 1 नोव्हेंबर कर्नाटक राजोत्सवादिवशी काळा दिन पाळण्यात येतो. सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा याकरिता म. ए. समितीच्या माध्यमातून गेली 65 वर्षे सातत्याने लढा सुरू आहे. या लढ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याचे पाठबळ आहे. सत्तेत असो किंवा नसो सीमा प्रश्न सुटावा यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. सीमाप्रश्नी वकिलांशी चर्चा करून सीमा प्रश्नातील बारकावे समजून घेण्याबरोबरच महाराष्ट्र सरकारला जाग आणण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे काळ्या दिनाचे आचरण फक्त बेळगावतच नव्हे तर महाराष्ट्राच्या सीमा भागातील प्रत्येक गावोगावी खेडोपाडी करण्यात यावे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन सीमा लढायला बळकटी देण्याची गरज असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली न्याय हक्क मिळे पर्यंत लढतच राहण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी केला.
1 नोव्हेंबर काळ्यादिनानिमित्त आज सकाळी बेळगाव शहरात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या विराट मूक निषेध फेरीचे मराठा मंदिर येथे जाहीर सभेत रूपांतर झाले या सभेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
(मराठा मंदिर येथील निषेध सभेत मनोगत व्यक्त करताना मध्यवर्ती म. ए .समितीचे अध्यक्ष दीपक दळवी) |
यावेळी बोलताना मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, मराठी भाषिकांच्या नव्या दमाच्या पिढीमध्ये सीमा प्रश्न सोडवण्याची जिद्द निर्माण झाली आहे. त्यांना मागील पिढीने केलेल्या त्यागाच्या शिदोरीवर सीमा प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. आज लोकशाहीत ज्यांनी लढा दिला ते कदाचित माझ्या वयाचे झाले असतील. पण आमच्या नंतर जे तरुण आलेत त्यांनी आमच्या पावलावर पाऊल ठेवत सीमा प्रश्न सोडविण्याचा ध्यास घेतला असून हे निश्चितच कौतुकास्पद आहे.तेव्हा त्यांनी पाठपुरावा करून सीमा प्रश्न सोडवावा अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बेळगाव सह सीमा भागातील तमाम मराठी भाषिक बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments