• जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे महत्त्वपूर्ण आदेश

बेळगाव / प्रतिनिधी 

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दोन प्रथम श्रेणी सहाय्यकांना (एफडीए) पूर्वपरवानगीशिवाय दीर्घ कालावधीसाठी गैरहजर राहून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश जारी केला आहे.

रामदुर्ग तहसील कार्यालयाचे प्रथम वर्ग सहाय्यक सी. एन. नागुर व रायबाग तहसील कार्यालयाचे प्रथम श्रेणी सहाय्यक ए. बी. बसरगी यांच्यावर दीर्घकाळ अनधिकृतपणे गैरहजर राहून कर्तव्यात कसूर केल्याचा व जबाबदारी पार न पाडल्याचा आरोप ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे.

रामदुर्ग तहसीलदार यांनी प्रथम श्रेणी सहाय्यक सी. एन. नागुर यांच्या अनधिकृत गैरहजेरीबाबत लेखी नोटीस बजावूनही त्यांनी योग्य कारण दिले नाही व कागदपत्रेही सादर केली नाहीत.

त्यातच प्रथमवर्ग सहायक ए. बी. बसरगी यांनी लेखी निवेदन सादर केले. मात्र त्यांचे कारण वाजवी नसल्याचे सत्यता पडताळून पाहिल्यावर दिसून आल्याने कर्मचाऱ्यांवरील आरोप सिद्ध होतो. त्यामुळे कर्नाटक नागरी सेवा नियम 1957 च्या नियम 8 नुसार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्यांना शासकीय कर्तव्यातून बडतर्फ करण्याचा आदेश जारी केला आहे.