- यात्रा काळात सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
पुढील महिन्यात पाच ते सात डिसेंबर दरम्यान सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील श्री रेणुका देवीची यात्रा होणार आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने आज बुधवारी बेळगावचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे.
बेळगाव सकल मराठा समाज अध्यक्ष किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या वतीने यात्रा काळातील समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात यात्रा काळात कोल्हापूर आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना डोंगरावर प्रवेश दिला जावा. पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. यात्रा काळात पिण्याचे पाणी, स्वच्छता, पथदीप, देवी दर्शन, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी यासंदर्भात विशेष उपाययोजना हाती घेण्यात याव्या.
पौर्णिमा यात्रेला तीन लाखांहून अधिक भाविक सौंदत्ती डोंगरावर उपस्थित असतात. त्यामुळे यात्रा काळात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी. चोरीच्या प्रकारांना आळा बसावा. यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मंदिर परिसरात अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. मंदिर परिसराचा कायापालट केला जात आहे. सौंदत्ती रेणुका देवी यात्रा काळात प्रशासनाच्या वतीने यात्रेकरूंच्या सोयी- सुविधांची काळजी घेत, तयारी करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षितते संदर्भात त्याचबरोबर वाहतुकीच्या संदर्भात उपाय योजना हाती घेतल्या आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष युवराज मोळे उपाध्यक्ष गजानन विभुते, सरचिटणीस अच्युत साळोखे, उपाध्यक्ष रमेश बनसोडे, खजिनदार मोहन साळोखे, सदस्य अशोकराव जाधव, दयानंद घबाडे, केशव माने, आनंदराव पाटील, तानाजी चव्हाण, चेतन पवळ, सतीश डावरे, आकाश पाटील, सरदार जाधव, शालिनी सरनाईक, लता सोमवंशी, नहोश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
0 Comments