सुळगा (हिं.) / वार्ताहर
येथील हिंडलगा हायस्कूलच्या 1987 -88 सालच्या बॅचमधील विद्यार्थी -विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन तब्बल 34 वर्षानंतर सोमनाथ लॉन, बॉक्साईट रोड हिंडलगा येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडले.
हिंडलगा हायस्कूलच्या सदर बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी संघटितपणे स्वखर्चातून शाळेच्या नूतन इमारतीची रंगरंगोटी करण्याद्वारे शाळेबद्दलची आपली आत्मीयता प्रकट केली. या रंगरंगोटी केलेल्या शाळा इमारतीचे गेल्या रविवारी सकाळी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सोमनाथ लॉन, बॉक्साईट रोड हिंडलगा येथे नागेश मन्नोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाची सुरुवात आणि स्वागत गीताने झाली. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यासह तुळशी वृंदावनाला पाणी घालून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दिवंगत शिक्षक के. सी. पाटील सर, एम. टी. पाटील सर, टी. बी. हेळवी सर, भातकांडे सर, आप्पाजी तरळे, अर्जुन कोलते, देवाप्पा मुतगेकर तसेच माजी विद्यार्थी कन्हैया नाईक, मारुती दंडगलकर, लक्ष्मण नेवगेरी, महादेव कडोलकर, एकनाथ दड्डीकर, आशा पाटील व सुजाता आगसगेकर यांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. संमेलनात हिंडलगा हायस्कूलच्या सर्व शिक्षकांचा माजी विद्यार्थी -विद्यार्थिनीतर्फे शाल, श्रीफळ व स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी राजीव गोडसे यांनी सर्वांना भगवद्गीतेची एक -एक प्रत भेटी दाखल दिली. सत्कारमूर्तींमध्ये माजी मुख्याध्यापक मालोजीराव अष्टेकर सर खन्नूकर सर, पिसाळे सर, जाधव सर, नाईक सर, एस. के. पाटील सर, आर. के. पाटील सर, एस. टी. पाटील सर, जी. बी. पाटील सर, श्रीमती अनगोळकर टीचर, विद्यमान मुख्याध्यापक रवींद्र तरळे सर, शिंदे सर, श्रीमती पाटील टीचर, श्रीमती मीराताई पाटील आदींचा समावेश होता. या सर्वांखेरीज सेना दलात सेवा बजावलेले बॅचमधील माजी विद्यार्थी कृष्णा किल्लेकर, ज्योतिबा भोसले आणि महादेव हिरोजी यांचाही शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्या येळ्ळूरकर, सरोजा पाटील, विकास देसाई, गणपत शहापूरकर, रेणुका कोलते, रेणुका चौगुले, संजय गावडे, चंदा बेळगुंदकर व शीला गडकरी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. उपस्थित शिक्षकवर्गाने देखील आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून सिद्राय बाळेकुंद्री यांच्या हस्ते केक कापून उपस्थित सर्वांचा 50 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. दुपारच्या भोजनानंतर माजी विद्यार्थिनींसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आणि विद्यार्थ्यांसाठी तीन पायाची शर्यत हे खेळ पार पडले. संगीत खुर्चीमध्ये रेणुका कोढते, लिला काकतकर आणि बाळक्का मंडोळकर यांनी अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. सदर स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांतर्फे अध्यक्ष नागेश मन्नोळकर, विकास देसाई, विनोद नाईक, शशी चौगुले, भाग्यश्री चोपडे, संजय पाटील, रेणुका कोलते, जयश्री पाटील व लीला काकतकर या कार्यकारी मंडळाचा सत्कार करण्यात आला. शेवटी रवींद्र तरळे यांनी सर्वांचे आभार मानले. स्नेहसंमेलनास हिंडलगा हायस्कूलचे 1987 -88 सालच्या बॅचमधील बहुतांश विद्यार्थी -विद्यार्थिनी आवर्जून उपस्थित होते.
0 Comments