बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव तालुक्याच्या ३४ गावातील शेकडो एकर सुपीक जमीन संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा रिंग रोड प्रकल्प रद्द करा अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देत महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या 28 नोव्हेंबरला बेळगावात मोर्चाचे आयोजन केले आहे.

रिंगरोडसाठी जमीन संपादित करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग मंडळाने एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध केले आहेया संदर्भात आज समिती नेत्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव तालुक्यातील ३४ गावातील सुपीक शेतजमीन संपादित करण्याचा घाट घातला जात आहे. येथील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह केवळ याच जमिनीवर  अवलंबून आहे. त्यामुळे जमिनी गेल्यास शेतकरी देशोधडीला लागतील अशी भीती निवेदनात व्यक्त केली आहे. दहा दिवसांच्या आत सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा अन्यथा 28 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर, टेम्पो मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, विकास कलघटगी, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.