• बेळगाव तालुका म. ए. समिती व अन्य संघटनांच्या बैठकीत आवाहन
  • 28 नोव्हेंबर रोजीचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यात होऊ घातलेल्या प्रस्तावित रिंगरोड मुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना सुपीक जमिनी गमवाव्या लागणार आहेत. रिंगरोड प्रकल्प शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे.त्यामुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी रिंगरोड होऊ नये याकरिता एकत्र आले आहेत. याच पार्श्वभूमीवर दि. 28 नोव्हेंबर रोजी रिंगरोड भूसंपादन विरोधात पुकारलेल्या मोर्चात कोणतेही राजकारण न करता सर्व संघटनांनी एकत्र यावे असे आवाहन बेळगाव येथे मराठा मंदिराच्या सभागृहात आज झालेल्या तालुका म. ए. समिती आणि अन्य संघटनांच्या बैठकीत करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन रिंगरोड विरोधातील मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धारही करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, रिंग रोडच्या नावाखाली शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न काहींनी चालवला आहे. तो हाणून पाडण्यासाठी दि. 28 नोव्हेंबर रोजी भूसंपादनाविरोधात पुकारलेल्या मोर्चात मतभेद, राजकारण, गट-तट विसरून सर्वांनी सहभागी होऊ या असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले, नियोजित रिंग रोडच्या आसपास कोणकोणत्या राजकारण्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. रिंग रोड झाल्यावर त्यांचा फायदा होणार असल्याने विकासाच्या नावाखाली रिंगरोड करून स्वार्थ साधण्याचा त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे त्यांनी सांगितले. आपण अन्नदाता असल्यामुळे स्वतःला कमी न लेखता कोणाची भीड न बाळगता युवकांना  सोबत घेऊन या लढ्यात उतरूया आणि लढा यशस्वी करूया. श्रीराम सेना हिंदुस्थान पाठिंबा देण्याबरोबरच लढ्याचे नेतृत्वही करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. यावेळी इतर नेत्यांनीही रिंगरोडच्या विरोधात गावोगावी जनजागृती करून शेतकऱ्यांना बहुसंख्येने आंदोलनात सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.

या बैठकीला ॲड. राजाभाऊ पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ॲड. एम.जी. पाटील, मनोज पावशे, एस.एल. चौगुले, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्यासह बेळगाव तालुक्यातील विविध गावचे शेतकरी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.