- जखमी युवकाच्या कुटुंबीयांचे शहर पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून एका युवकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्यावर दगडाने हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदन जखमी युवकाच्या कुटुंबीयांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांना सादर केले.
मंगळवारी रात्री बेळगाव शहराच्या भाग्यनगर परिसरात क्षुल्लक कारणावरून चौघा युवकांनी एकत्र येत आशिष बाबाजी शेणवी नामक युवकाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन त्याच्यावर दगडाने हल्ला केला होता. या घटनेनंतर तो गंभीर जखमी झाला होता.
याप्रकरणी जखमी आशिषच्या कुटुंबीयांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे टिळकवाडी पोलिसांनी अनगोळ येथील दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. मात्र या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे जखमी आशिष शेणवी यांच्या कुटुंबीयांनी आज शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन मारहाण करणाऱ्यांपैकी इतर दोघांना अटक करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेणवी कुटुंबियांसह त्याचे नातेवाईक आणि हितचिंतक उपस्थित होते.
0 Comments