बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळाच्या बसेसना काळे फासण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन मंडळाने कर्नाटकातील बससेवा तात्पुरती बंद केली आहे.

दरम्यान कर्नाटक परिवहनच्या बसला महाराष्ट्रात दौंड येथे तिथल्या मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासून कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी सीमा प्रश्नाबाबत केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याचा निषेध केला आहे. तर कर्नाटकाच्या हद्दीत त्याचीच रे ओढण्याची तयारी कानडी पुंडांनी चालवली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कर्नाटकात धावणाऱ्या 300 हून अधिक बसेसची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेस बेळगाव, चिक्कोडीसह राज्याच्या अनेक भागात धावतात. त्या बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र कर्नाटकातून महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे बसेस धावत आहेत.