निपाणी / प्रतिनिधी 

निपाणी तालुक्याच्या भोज गावातील 83 हून अधिक शेतकरी 2018 साली सरकारने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. सदर शेतकऱ्यांचे कर्ज माफ न झाल्याने आज निपाणी पीकेपीएस समोर ठाण मांडून शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले.

तत्कालीन कुमारस्वामी सरकारने 2018 साली शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे एक लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती.मात्र निपाणी तालुक्यातील सुमारे 83 शेतकरी गेल्या चार वर्षांपासून सरकारच्या या सुविधेपासून वंचित असून सदर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कोणताही लाभ  मिळालेला नाही. या विरोधात पीकेपीएस सहकारी संघाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठाण मांडून उपोषण केले.

आंदोलनाची माहिती मिळताच चिकोडी शेतकरी संघाचे अध्यक्ष राजू पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी सरकार दरबारी विनंती करणार असल्याचे सांगितले.

याचप्रमाणे चिक्कोडी सहकारी संघाचे सहाय्यक संचालक एम.एस.गौडप्पनवर, सहाय्यक अमित शिंदे यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले.

यावेळी पीकेपीएस अध्यक्ष अदगौडा पाटील, सचिव राजू पाटील, निपाणी तालुका शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष रमेश पाटील, एकनाथ सादळकर, जिनगौडा पाटील, शितल बागे, शाहू मिठारे,शशिकांत नरदगे, जिनगौडा बेडकीहाळ, निंगौडा पाटील, पद्माकर टाकळे, श्रीकांत साळुंके, राजेंद्र मुगळे, संजय कमते आदि उपस्थित होते.