• रायबाग तालुक्याच्या बावनसौंदत्तीतील स्थिती
  • 200 एकरहून अधिक जमीन पाण्याखाली
  • पिकांचे मोठे नुकसान

रायबाग / वार्ताहर 

रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती गावातील 200 एकरहून अधिक जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक आमदार व ग्रामपंचायतींना ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचे आवाहन करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती गावातील 200 एकर पेक्षा जास्त शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. गेल्या 10 वर्षांपासून उदभवणाऱ्या या परिस्थितीमुळे एकही पीक हाती लागलेले नाही. शेतकर्‍यांना एकामागोमाग एक नव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लोकप्रतिनिधींना याची अजिबात काळजी नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सरकारने या जमिनी घ्याव्यात आणि आम्हाला इतरत्र जमीन द्यावी, आम्ही तेथे जाऊन शेती कसून पोट भरून घेईन अशी आर्त विनवणी अश्रूभरल्या डोळ्यांनी शेतकरी करत आहेत. ही समस्या आम्ही आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्या निदर्शनास आणून दिली. पण ते फक्त माळरानातील लोकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहेत. तिकडे खासदार अण्णासाहेब जोल्ले केवळ निप्पाणी आणि चिक्कोडी मतदारसंघाचा विकास करत आहेत. रायबागकडे कोणाचेही लक्ष नाही. स्थानिक ग्रामपंचायतीलाही आम्ही निवेदन दिले आहे. गावातील नेत्यांना कळवले. आमच्या समस्यांकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही, अशी खंत माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत मंगसुळे यांनी व्यक्त केली.