- शिवाजीनगर येथील रहिवाशांची मागणी
- मुलाच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने
- पोलीस आयुक्त कार्यालयावर काढला निषेध मोर्चा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथील रहिवाशांनी 16 वर्षीय शाळकरी मुलाच्या हत्येचा निषेध करत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शहरात जोरदार निदर्शने केली.
दि. 20 ऑक्टोबर रोजी बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावानजीक शिवारात छ. शिवाजीनगर 5 व्या गल्लीतील प्रज्वल शिवानंद करिगार या 16 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण छ. शिवाजी नगर परिसरात खळबळ माजली होती. शाळेतून परतत असताना काही चोरट्यांनी प्रज्वलला दुचाकीवर बसवून त्याची निर्घुण हत्या करून मुचांडी शिवारात त्याचा मृतदेह फेकून दिला. या घटनेचा निषेध करत आज शनिवारी शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांनी शिवाजीनगर ते संगोळ्ळी रायाण्णा सर्कल मार्गे शहर पोलीस आयुक्त कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा काढला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांनी शाळकरी मुलांची अशी हत्या होत असेल तर आम्ही मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? असा मुद्दा उपस्थित केला. यापुढे अन्य कोणत्याही मुलांसोबत असा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करावी; अन्यथा शिवाजीनगर मध्ये आणून आमच्या ताब्यात द्यावे , त्यांना काय द्यायची ती शिक्षा आम्ही देतो असे म्हणत संताप व्यक्त केला.
यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले, अलीकडे बेळगाव शहरात खुनांचे प्रकार वारंवार घडत आहेत. शुल्लक कारणांवरून खुनांच्या घटना घडत आहेत. छ. शिवाजीनगर येथील विद्यार्थ्यांची अमानुष हत्या करण्यात आली आहे. तेव्हा त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच शहरातील विद्यार्थी, युवक गांजा अंमली पदार्थ व इतर वाईट गोष्टींच्या आहारी जात आहेत. तेव्हा अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करताना, शिवाजीनगर येथील त्या शाळकरी मुलाच्या मारेकऱ्यांवर दोन दिवसात कठोर कारवाई न झाल्यास श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
यानंतर प्रज्वल चे कुटुंबीय आणि शिवाजीनगरमधील रहिवाशांनी पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांना निवेदन देऊन या खून प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा आणि आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. याप्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात अज्ञात मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
0 Comments