• बेळगावच्या सदाशिवनगर स्मशानभूमीतील प्रकार
  • मनपाचा अजब कारभार
  • नागरिकांतून संताप

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील सदाशिवनगर स्मशानभूमीत वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून लोकवर्गणीतून सुधारणा करण्यात आल्या आहेत. मात्र लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी असलेल्या स्मशानभूमीत सध्या मनपाचे टँकर्स, ट्रॅक्टर-ट्रेलर, रुग्णवाहिका शहरातील कचरा भाऊ आणि मोठ्या संख्येने पार्क केलेली दिसून येत आहेत. त्यामुळे येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसमोर ही स्मशानभूमी आहे की पार्किंगतळ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

पार्क केलेल्या वाहनांची ये-जा होत असल्यामुळे स्मशानभूमीतील काँक्रिटचे चांगले रस्ते खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अवजड वाहनांमुळे या सिमेंटच्या रस्ते शेजारील जमीन खचून चिखल निर्माण होण्याबरोबरच पावसाचे पाणी साचल्याने अंत्यसंस्काराला येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

याची गंभीर दखल सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांनी घेतली असून येत्या आठ दिवसात स्मशानभूमीत पार्क केलेली वाहने हटविण्यात यावीत अन्यथा आपण स्वतः त्यावर तोडगा काढणार असा इशारा त्यांनी दिला आहे.