• महापालिकेने राबविली मोहीम
  • पाच हून अधिक घरे, एक गॅरेज,एक दुकान हटविले
  • नागरिकांनी व्यक्त केला संताप 
  • घरासमोर बसून छेडले धरणे आंदोलन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महापालिकेने गोवावेस सर्कल मध्ये राबवलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला रहिवाशांनी तीव्र विरोध केला. मात्र विरोध न जुमानता महापालिकेने मोहीम राबवली.

बुधवारी पहाटे गोवावेस सर्कलमध्ये मोकळ्या जागेत अतिक्रमण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत इमारती हटविण्याची कारवाई सुरू केल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी घरासमोर बसून धरणे आंदोलन. या वेळी कोणत्याही परिस्थितीत इमारती मोकळ्या करून जागा ताब्यात देणार नाही असे महिलांनी ठणकावून सांगितले. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाली. यावेळी आंदोलन करणाऱ्या एकाला शहापूर पोलिसांनी अटक केली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी बंदोबस्तासाठी 30 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. 

यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणा देत रहिवाशांनी संताप व्यक्त केला. तरीही विरोधाला न जुमानता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 5 हून अधिक घरे, एक गॅरेज आणि एक दुकान जेसीबीच्या साह्याने जमिनदोस्त केले. त्यामुळे या कारवाई ज्यांची घरे गेली आहेत. ते या कारवाई विरोधात कोणत्या प्रकारे लढा देतील हे पाहावे लागणार आहे.