- वांते येथील रस्ता गेला वाहून
- नाणूस येथील घरामध्ये पाणी घुसून नुकसान
दोन दिवसानंतर पुन्हा एकदा सत्तरीतील अनेक भागाला जोरदार पावसाचा तडाखा बसला. वांते वरचावाडा येथे रस्ता वाहून गेला असून यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे. नाणूस येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे नागरिकांची दैनावस्था झाली. तेथील काही घरांमध्ये पाणी घुसले.दरम्यान, दोन तासांमध्ये २.५० इंच पावसाची नोंद झाली असून अचानकपणे सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी दोन तास पाऊस लागून वाळपई शहरामध्ये गंभीर समस्या निर्माण झाली होती. दोन दिवसांनी पुन्हा एकदा वाळपई शहराला जोरदार पावसाचा तडाखा बसला. वांते वरचावाडा भागाला फटका बसला असून रस्ता वाहून गेला आहे. जवळपास १०० मीटर रस्ता वाहून गेला. सरपंच उदयसिंग राणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
पाऊस संपल्यानंतर स्थानिकांनी या संदर्भात पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. यावेळी सरपंच उदयसिंग राणे उपस्थित होते. नाणूस याठिकाणी रस्ता पाण्याखाली गेला होता. पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहून या ठिकाणी नजीक असलेल्या घरामध्ये पाणी घुसले. यामुळे किरकोळ प्रमाणात नुकसान झाले. सदर भागातील रस्त्यावर पाणी भरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
0 Comments