- वाघोत्रे येथे चंदगड पोलिसांची कारवाई
चंदगड / वार्ताहर
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करताना दोघांना अटक करण्यात आली. रविवारी पारगड-चंदगड रोडवर चंदगड पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह, महिंद्रा बोलेरो गाडी असा साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बाळासाहेब अश्रूबा केदार (वय 27) रा. गप्पेवाडी व सुरेश गोपाळ गरे (रा. बाणेवाडी; जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी रविवारी (एम. एच. 26 ए एफ 0325) या क्रमांकाच्या बोलेरो गाडीतून महाराष्ट्राचा कर चुकून पारगड- चंदगड रोडवर वाघोत्रे येथे आले असता पेट्रोलिंग वर गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक एच. एस. नाईक व पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये 5 लाख 46 हजार 550 रुपयांची गोवा बनावटीची दारू आढळून आली. यानंतर पोलिसांनी दारूसह पाच लाख रु. किमतीची महिंद्रा बोलेरो असा एकूण दहा लाख 46 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे पोलीस उपनिरीक्षक नाईक व पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
0 Comments