• हुक्केरी पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

एका अल्पवयीन चोरट्याला अटक करून त्याच्याकडून 3 लाख 9 हजार  600 रु. किंमतीचे सोने आणि चांदीचे दागिने हस्तगत करण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार 11 ऑक्टोबर  रोजी सकाळी 8.30 ते 12 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान काही चोरट्यांनी हुक्केरी येथील सुधाकर रंगनाथ नाईक यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील तिजोरीत ठेवलेले 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि 165 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व रोख 11 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी हुक्केरी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे प्रकरण गांभीर्याने घेत जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी यांनी गोकाकचे डीएसपी मनोजकुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरीचे पोलीस निरीक्षक मोहम्मद रफीक तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक एम.के.मन्नीकेरी, एएसआय सनदी, रवी धंगा व गुन्हे शाखेचे कर्मचारी जी.एस.कांबळे, मंजुनाथ एस. कल्लुरा, एस. आर. रामदुर्गे, अजित नाईक, व्ही. नवी यांचा पथकाने ही कारवाई केली.  यू. वाय. अरबमवी, ए. एस.थिरागन्नावर, एम. के. अत्तार यांनी या प्रकरणाचा छडा लावला. अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन चोरट्याकडून 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ,165 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि 9 हजार 500 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

या चोरीचा यशस्वी तपास करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाचे बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी कौतुक केले आहे.