घराच्या अंगणातील अण्णा  पाटकर यांच्या
दुचाकीची अज्ञात चोरट्याने फाडलेली सीट
 
बांदा दि. 23 वार्ताहर :

बांदा - पत्रादेवी मार्गावर देऊळवाडी येथे रस्त्यानजीक वर्दळीच्या ठिकाणी  अज्ञात चोरट्याकडून दुचाकी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. गुरुवारी रात्री  घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

अज्ञात चोरटयांनी कापलेले दुचाकीचे वायरिंग 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बांदा पत्रादेवी मार्गावर भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख अण्णा पाटकर यांनी नेहमीप्रमाणे घराच्या अंगणात आपली होंडा डीओ कंपनीची दुचाकी उभी केली होती. गुरुवारी रात्री अज्ञाताने दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन दिवसांपूर्वीच पाटकर यांनी दुचाकीची  लॉक सिस्टीम बदलली होती. त्यामुळे  लॉक न उघडता आल्याने दुचाकी चोरण्यात  चोरट्याला यश आले नाही.

चोरीचा प्रयत्न फसल्याने रागाच्या भरात चोरट्याने गाडीची सीट फाडून, वायरिंगही कापून टाकले. आज सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर पाटकर यांनाही धक्का बसला. वैयक्तिक रागातून अज्ञाताकडून हे कृत्य घडले असण्याची शक्यताही पाटकर यांनी व्यक्त केली आहे.