(पूरग्रस्त भागाची पाहणी करताना जिल्हाधिकारी नितेश पाटील)

              जिल्हाधिकाऱ्यांनी केली विविध भागांची पाहणी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील केशवनगरसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी  बाधितांना धीर दिला.

 खासबाग साईभवन केअर सेंटरलाही दिली भेट 

खासबागजवळील साई भवन केअर सेंटरलाही भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी  यंत्रणेची पाहणी केली.त्यानंतर माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सतर्कता बाळगण्याची सूचना केली असली, सतत पाऊस पडेल असेही नाही. मात्र रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शहर परिसरात घरांमध्ये पाणी शिरले आहे. गेल्या 24 तासात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. गेल्या महिन्यात जीवितहानी झालेल्यांना यापूर्वीच पाच लाखांची भरपाई दिली आहे. तसेच गेल्या महिन्यात जेव्हा पाऊस पडला तेव्हा आम्ही केअर सेंटर उघडले. तेव्हा फक्त 8 लोक आले होते. यावेळी कोणीही आले नाही. येथे आम्ही एकावेळी 200-300 लोकांची व्यवस्था करण्याची तयारी केल्याचीही त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्यात आमच्याकडे एकूण 388 केअर सेंटर उपलब्ध असून आम्ही सर्व तयारी केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.