हिंडलगा रोडवर पुन्हा बिबट्याचे दर्शन : वनविभाग सतर्क...!

गोल्फ क्लब परिसरातील 'त्या' 22 शाळांना आजही सुट्टी


बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरानजीक हिंडलगा रोडवर महात्मा गांधी सर्कल जवळ आज सकाळी 6 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास क्लब रोड येथे रस्त्यालगतच्या झाडीत  असलेला बिबट्या एका खाजगी बस चालकाच्या नजरेस पडला. प्रसंगावधान राखून बस चालकाने  मार्गावरून येणाऱ्या  इतर वाहनधारकांना सावध केले.तसेच आपल्या मोबाईल मध्ये त्या बिबट्याचा व्हिडिओ चित्रीत केला. या व्हिडिओमध्ये बिबट्या रस्त्यालगतच्या झाडीतून बाहेर पडत मुख्य मार्ग ओलांडून पलीकडे गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. चित्रित केलेला व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओ ची दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत,  बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम आणखीन तीव्र केली आहे. खबरदारी म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनीही गोल्फ क्लब परिसरातील त्या 22 शाळांना आजही सुट्टी जाहीर केली आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने जाधव नगर परिसरात एका गवंडीकामगारावर हल्ला हल्ला करून जखमी केले होते. यानंतर परिसरात बिबट्याची दहशत माजली होती. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस आणि वनविभागाने परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या होत्या. जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनीही परिसरातील 22 शाळांना आठवडाभर सुट्टी दिली होती.  वनविभाग आणि पोलिसांची बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरू आहे. गेल्या बुधवारीही पोलीस आणि वनविभागाने गोल्फ क्लब परिसरातील जंगलात संयुक्तपणे मोहीम राबवून बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण बिबट्या सातत्याने हुलकावणी देत आहे.