![]() |
(बालचमूचे रक्षाबंधन) |
बेळगाव / प्रतिनिधी
'रक्षाबंधन' या दिसाची, 'अनिवार' मी वाट पाहते, दृढ करण्या 'बहिण-भावाचे' अनमोल असे हे नाते!... असे म्हणत भाऊ-बहिणीच्या नात्यातील पवित्र रक्षाबंधनाचा सण गुरुवारी 11 ऑगस्ट रोजी शहरासह तालुक्यात अतिशय आनंदात साजरा करण्यात आला. अगदी लहान मुले, तरुणाई, वृद्धांमध्ये सणाचा उत्साह दिसून आला.
सकाळपासूनच सर्वत्र रक्षाबंधनाची लगबग सुरू होती. राखी बांधून घेण्यासाठी भावांची बहिणींकडे तर भावाला राखी बांधण्यासाठी बहिणींची भावांकडे जायची लगबग पाहायला मिळाली.रक्षाबंधनाच्या निमित्ताने फॅमिली गेट-टुगेदरहीची क्रेझ अधोरेखित झाली.
शाळा व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे बालचमूसह सरकारी नोकरदारांचे रक्षाबंधन सकाळ पासूनच सुरु होते. पण खाजगी नोकरीत असणाऱ्यांनी कामातून वेळ काढत रक्षाबंधन साजरे केले.
रक्षाबंधन निमित्त मिठाईची मोठी खरेदी
श्रावण महिन्यात अधिकाधिक सण साजरे होतात. यासाठी मिठाई व गोड पदार्थांना विशेष मागणी असते. आजही रक्षाबंधन निमित्त शहर परिसरातील मिठाई दुकानांमध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होती. यामुळे मोठी उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मिठाई प्रमाणेच बहिणींना भेटवस्तू देण्यासाठी ज्वेलरी, वस्त्रप्रावरणे यासह इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.
एकंदरीत मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाही रक्षाबंधनाचा सण अगदी नेहमीच्याच उत्साहात पार पडला.
0 Comments